आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्र्यांनी दिली साद
हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : आ. तान्हाजी मुटकुळे यांचे शासन दरबारी नेहमी वर्चस्व असते. वाढीव मदतीतून वगळलेल्या दोन्ही तालुक्यांचा पुन्हा समावेश झाल्याने आ. मुटकुळेंच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
सर्वत्र ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. शासनाने ९ ऑक्टोंबरला काढलेल्या वाढीव आर्थिक मदतीतून हिंगोली व सेनगाव तालुक्याला वगळल्याने शेतकर्यातून तिखट प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात होत्या. आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तात्काळ संपर्क साधल्या नंतर १० ऑक्टोंबरला काढलेल्या शासन निर्णयात वगळलेल्या दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात आला.
जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह हळद, कापुस व इतर पिकांचे आणि फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच गुरे, ढोरेही पुराच्या पाण्यामुळे वाहुन गेले. या नुकसानीबद्दल प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर ३ लाख शेतकर्यांचे २.७१ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याने शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यासाठी २३१ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून शेतकर्यांना मदत देताना २ हेक्टर मर्यादेपर्यंतच मदत देण्याचे जाहीर केले. मदतीची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात डिबीटीव्दारे जमा केली जात आहे. त्यानंतर राज्य शासनाने राज्यातील अतिवृष्टीग्रस्त असलेल्या २५३ तालुक्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व औंढा नागनाथ या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये हिंगोली आणि सेनगाव तालुक्याचा समावेश केला नसल्याने शेतकर्यातून संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणात आमदार तान्हाजीराव मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे तात्काळ संपर्क साधला. ज्यामध्ये आ. मुटकुळेंनी या दोन्ही तालुक्यातील पर्जन्यमान, जिथे जिथे शेती वाहून गेली तेथील पिकांचे नुकसान या बाबत प्रशासनाने पाठविलेल्या अहवालाचे मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती देण्यात आली असता त्यांनी या वगळलेल्या दोन्ही तालुक्यांचा समावेश केला जाईल असे आ. तान्हाजी मुटकुळेंना आश्वस्त केले. त्यानुसार १० ऑक्टोंबरला काढलेल्या आदेशात वगळलेल्या हिंगोली व सेनगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही तालुक्याला वाढीव मदतीचा व सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
दोन्ही तालुक्याचा समावेश झाल्याने शेतकरी समाधानी:- ९ ऑक्टोंबरला काढलेल्या शासन आदेशात हिंगोली व सेनगाव तालुक्याला वाढीव मदतीपासून वंचित ठेवले होते. आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तात्काळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर दोन्ही तालुक्याचा समावेश केला जाईल, असे त्यांना आश्वस्त केले होते. त्यानुसार १० ऑक्टोंबरला काढलेल्या आदेशात वगळलेल्या दोन्ही तालुक्यांचा समावेश झाल्याने शेतकर्यांतून समाधान होत आहे.