Parbhani :- परभणीतील जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीतील उपसरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव कायम ठेवत उपसरपंचांना अपात्र करण्यात आले आहे. तसेच तीन आपत्य संख्या असल्यामुळे एक ग्रामपंचायत सदस्याचे पदही अपात्र ठरले आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नुकतेच आदेश दिले आहेत, अशी माहिती अॅड. देवराव दळवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
उपसरपंचावरील अविश्वास ठराव कायम;सदस्य तीन आपत्यांमुळे अपात्र…!
कौसडी येथील उपसरपंच साधना रविकांतराव देशमुख यांच्या विरोधात ५ मार्च २०२५ रोजी पारीत केलेला अविश्वास ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही पक्षकारांना नोटीस (Notice) काढण्यात आल्या. गैरअर्जदार हे अॅड. देवराव दळवे यांच्या मार्फत हजर झाले. सदर प्रकरणात अॅड. दळवे यांनी बाजु मांडली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ९ मे रोजी आदेश देत उपसरपंच साधना देशमुख यांच्यावरील अविश्वास ठराव कायम ठेऊन अपात्र केले. तर ग्रा.पं. सदस्य अंजना एकनाथराव इखे या तीन आपत्यामुळे अपात्र ठरल्या आहेत. जिल्हाधिकार्यांनी १३ मे २०२५ रोजी निर्णय दिला आहे. तीन आपत्य असल्याबाबत नोंदी आढळून आल्या. सदस्याने शपथपत्रातील दोन आपत्यांबाबत दिलेली माहिती चुकीची आहे अशी बाजु अॅड. दळवे यांनी मांडली. युक्तीवाद ग्राह्य धरुन ग्रा.पं. सदस्य अंजना इखे यांना सदस्य पदावरुन अपात्र करण्यात आले आहे.