औसा (Latur):- विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Elections) तिकडे निलंग्यात ‘गबरू’च्या अब्रूचा विषय जोरदार चर्चेत आला असतानाच इकडे औशामध्ये भाजपाई आता विधानसभा निवडणुकीतील आपल्या ‘मित्रां’ना बिस्कुटे फेकण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीत फेकलेल्या बिस्कुटांचा पुरता ‘इम्पॕक्ट’ लागू झाल्याने नगरपालिका निवडणुकीतही ‘बिस्कुट फेको’ लाभदायक ठरेल, असे ‘हसीन सपने’ सध्या ‘मुंगेरीलाल’ पाहताना दिसत आहेत. असे असले तरी ही बिस्कुटे नेमकी कोणाच्या ‘तोंडात’ पडणार याची उत्सुकता तमाम औसेकरांना लागली आहे. एकंदर गरीबांच्या लेकरांना मोकाट कुत्र्यांनी फाडल्याचा विषय असा नीच पातळीवर आणला गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
भाजपाचे लोक आता ‘मित्रां’नाही बिस्कुटे फेकण्याच्या तयारीत..!
औसा शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या मोकाट कुत्र्यांनी थेट गोरगरिबांच्या लेकरावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील कुरेशी गल्लीमध्ये एका तीन वर्षीय बालिकेवर या कुत्र्याने शनिवारी दुपारी हल्ला केला. या कुत्र्यांनी आपल्या घरासमोर खेळणाऱ्या मुलांवर हल्ला केल्याने त्यातून बचावापासून पळणारा एक बालक नालीत जाऊन पडला तर दुसरी बालिका या मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडली. कुत्र्यांनी तिला घोरमाडून तिचे अक्षरशः लचके तोडले. मान, हात, पाठ, चेहरा फोडून काढला. ही मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. आजूबाजूच्या लोकांनी या मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून तिची सुटका केली व तिला लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
काही वर्षांपासून औसाच नव्हे, तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज
गेल्या काही वर्षांपासून औसाच नव्हे, तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज आहे. औशातही नगरपालिकेचे कारभारी हे मुख्याधिकारीच आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांची मनमर्जी कोणीही रोखू शकणारा नेता व नेतृत्व सध्यातरी निर्माण झाले नाही. काही माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांनी औसा नगरपालिकेच्या कारभाराकडे पाहणे सुरू केले; मात्र ते पाहण्याची दृष्टी ‘आशाळभूत’ असल्याने पालिकेच्या प्रशासनाने कदाचित त्यांच्यासाठी कोलदांडा वापरला असावा. म्हणूनच की काय औसा शहरात गोरगरिबांच्या प्रश्नाचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणीही नेता पुढे येत नाही.
स्वार्थाने जखडलेले नेते एकमेकांना ‘पाण्यात’ पाहण्यात मश्गुल झाले
प्रत्येकाला आपला स्वार्थ पडल्याने या स्वार्थाने जखडलेले नेते एकमेकांना ‘पाण्यात’ पाहण्यात मश्गुल झाले आहेत. हे पाहणे इतके गंभीर झाले हे प्रत्येक नेता, कार्यकर्ता स्वार्थासाठीच राजकारण करतो, असा ठाम विचार औशातील काही नेत्यांचा झाला आहे. त्यामुळेच हा कुत्र्यांचा विषय एखाद्या संघटनेने, पक्षाने, कार्यकर्त्याने किंवा व्यक्तीने गांभीर्याने घेतला असला तरी टवाळखोरांना हा विषय स्वार्थाचाच वाटत आहे. त्यातूनच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांची टिंगल उडवत त्या आंदोलनकर्त्यांना बिस्कुटे फेकण्याची मोहीम काही लोकांनी उघडली. अर्थात् ही बिस्कुटे विधानसभा निवडणुकीत आपल्या सोबत असलेल्या मित्रांसाठी असल्याने ही बिस्कुटे नेमकी आता कोणाच्या तोंडात पडतात? याकडे औसेकरांचे लक्ष लागले आहे.