गिरोली येथील १३ वर्षीय चिमुकला गेला पुरात वाहून
ग्रामस्थ घेत आहे शोध; दोन युवक सुखरूप बाहेर
मानोरा (Manora flood) : तालुक्यातील गिरोली येथील यश दिलीप आमटे ( १३ वर्ष ) दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी गोखी नाल्यात वाहून गेल्याने त्याचा शोध ग्रामस्थ घेत आहे. सविस्तर असे की, माहे ऑगस्ट पासून सतत, संततधार, अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस सुरू आहे. (Manora flood) गिरोली परिसरात शुक्रवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने गिराट येथील धरणाच्या सांडव्यावरून पुराचे पाणी वाहून आले. प्रवाह वाढल्यामुळे गोखी नाल्याला महापुराचे स्वरूप आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता गिरोली येथील यश आमटे व त्याचे दोन मित्र गोखी नाल्यावर पोहण्यासाठी गेले असता (Manora flood) पाण्याचे प्रवाह वाढल्याने यश नाल्यात पुरात वाहून गेला तर दोन मित्र सुखरूप बाहेर निघाल्याची घटना घडली आहे. याबाबत तहसीलदार यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करत प्रस्तुत प्रतिनिधीने माहिती घेतली असता नैसर्गिक आपत्ती विभाग व बचाव शोध पथकाला कळविले असुन मंडळ अधिकारी, पटवारी यांना घटनास्थळी पाठवण्यात आले असुन ग्रामस्थांच्या सहाय्याने पुरात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा शोध वृत्त लिहिस्तोवर सुरूच आहे.