Gadchiroli :- ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन, सवंर्धन व जागतिक स्तरावर ओळख निर्माण करुन देणार्या व्यक्ति तसेच संस्थांना ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला मूर्त व अमूर्त सांस्कृतिक घटकांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. हा वारसा संस्कृतीचा, कलेचा, साहीत्याचा, शौर्याचा आणि अभिमानाचा असून, या वारशामुळे महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक जडण-घडण दृढ होण्यास मदत झाली आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये गडकिल्ले प्राचीन स्मारके आणि इतर वारसा स्थळाचा समावेश होतो.
स्वराज्याचे अभेद्य शिलेदार झाले जागतिक वारसा
या वारसा स्थळामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे गड किल्ले होत. छत्रपती शिवाजी महाराजानी निर्माण केलेल्या स्वराज्याचे अभेद्य शिलेदार म्हणून महत्त्वाची आणि मोलाची कामगिरी या गड किल्ल्यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यानी गड किल्ल्यांचे महत्त्व ओळखून स्वराज्यामध्ये गड किल्ल्यांचे जाळे आणि दुर्गाची साखळी निर्माण केली होती. महाराष्ट्रामध्ये असणारे ४०० पेक्षा जास्त गड किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची साक्ष देत आजही खंबीरपणे उभे आहेत. यामधील अनेक गडकिल्ले शिवचरणांच्या स्पर्शाने पावन झालेले आहेत. स्वराज्यातील या गडकिल्ल्यांपैकी रायगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, साल्हेर, लोहगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा व जिंजी या बारा किल्ल्यांचा युनोस्कोच्या वारसा यादीमध्ये मानांकन मिळालेले असून ही तमाम महाराष्ट्रीयांसाठी व भारतीयांसाठीही अभिमानाची बाब आहे.
याशिवाय राज्यातील इतर अनेक ऐतिहासिक वारसा स्थळे आपल्या समृद्धतेची प्रतिके आहेत. या ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन, संवर्धन व आंतरराष्ट्रिय स्तरावर ओळख निर्माण करणार्या अनेक संस्था आणि व्यक्ति राज्यात कार्यरत आहेत. ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतन, संवर्धन आणि आंतरराष्ट्रिय स्तरावर ओळख निर्माणात अतुलनीय योगदान दिलेल्या व्यक्ती/संस्थाना ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी संचालनालयाने संदर्भाधिन पत्रान्वये प्रस्तावित केले होते. त्यानुषंगाने, ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार’ या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.