सकल बंजारा समाज आक्रमक; एक गोर, सव्वालाखेर जोर!
असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही!
मानोरा (ST Reservation) : महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला (Banjara Society) हैदराबाद गॅजेट नुसार अनुसूचित जाती (एसटी) चे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी दि. २९ सप्टेंबर रोजी जिल्हा ठिकाणी वाशिम येथे निघालेल्या मोर्चामध्ये लाखो बंजारा समाज बांधव व भगिनी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महामहीम राज्यपाल यांना सकल बंजारा गोर बंजारा समाज व विविध संघटनेच्या वतीने निवेदन पाठविले.
पारंपरिक वेशभूषेत हजारो महीला मोर्चात सहभागी!
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आदिम बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून (Tribal Category) वंचित ठेवून अन्याय करण्यात आला आहे. पिढी अन पिढी सकल बंजारा समाज जंगलात व तांडा तांड्यात राहतो. तरीही या समाजाची ओळख नाकारल्या गेली आहे. निजामशाही काळात तत्कालीन हैदराबाद राज्यात बंजारा, लबाडी, सुकळी समाजाला अनुसूचित जमाती (ST) म्हणून मान्यता होती. फसली सन १३०५, १३१४ व अन्य नोंदीमधून हे स्पष्ट दिसून येते. परंतु १९४८ नंतर हैदराबाद राज्याचे तीन तुकडे झाले.
जय सेवालाल जयघोषाने दुमदुमले वाशीम शहर!
तेलंगणा, मराठवाडा (महाराष्ट्र) व कर्नाटक, तेलंगणमध्ये आजही सकल बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा हक्क आहे. कर्नाटकात काही जिल्हयात अनुसूचित जमातीचे दाखविले गेले आहे. पण महाराष्ट्रात, मराठवाड्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीचा दर्जा हिरावून घेतला गेला आहे. एकाच समाजाला केवळ सीमा विभाजनामुळे वेगळे दर्जा देणे हा सकल बंजारा समाजावर गंभीर अन्याय आहे.
जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व महामहीम राज्यपाल यांना निवेदन!
मुंबई राज्य सरकारने मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन पुकारल्यावर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण दिले आहे. त्याच हैदराबाद गॅझेट नुसार अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा नवी दिल्ली जंतर मंतर व मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार, असे जिल्हाधिकारी मार्फत पाठविलेल्या निवेदनातून मुख्यमंत्री व महामहीम राज्यपाल यांना कळविले आहे. निवेदन देतेवेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा!
कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणातून निघालेला सकल गोर बंजारा समाज बांधवांचा भव्य मोर्चा जय सेवालाल, एक गोर सव्वा लाखेर जोर, आरक्षण आमच्या हक्काचा नाही कोणाचा बापाचा अशा घोषणा देत भव्य मोर्चा पुसद नाका, वसंतराव चौक (बस स्टॉप), विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. क्रिडा संकुल जवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी महंत कबिरादास महाराज, प्रा. अनिल जाधव यांच्यासह इतर समाज बांधवांनी मोर्चात सहभागी लाखो समाजबांधवांना संबोधित केले.