11 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक सूचना लागू; NEFT, ATM आणि बँक प्रतिनिधींच्या माध्यमातून पैसे पाठवण्याच्या व्यवहारांसाठी स्वतंत्र मर्यादा निश्चित.
देशातील बँकिंग व्यवस्थेत पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बँक खाते नसलेल्या नागरिकांनाही आता अधिकृत बँकिंग यंत्रणेच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. यासाठी NEFT सुविधेचा वापर करता येईल. RBI ने 11 नोव्हेंबर 2026 रोजी जारी केलेल्या नवीन नियमांची अंमलबजावणी तातडीने सुरू केली आहे.
नव्या नियमांनुसार, स्वतःचे बँक खाते नसलेली व्यक्ती बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन NEFT द्वारे एका व्यवहारात कमाल 50 हजार रुपये दुसऱ्याच्या बँक खात्यात पाठवू शकते. विशेष म्हणजे, पैसे पाठवण्यासाठी संबंधित व्यक्तीचे त्याच बँकेत खाते असणे आवश्यक नाही.
याशिवाय, बँकेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणजेच बिझनेस करस्पॉन्डंट (BC) आणि ATM यांच्यामार्फतही पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या माध्यमातून एका व्यवहारात जास्तीत जास्त 5 हजार रुपये पाठवता येतील. तसेच, एका महिन्यात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीसाठी 25 हजार रुपयांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
दुसरीकडे, बँक खात्यातून पैसे काढून बँक खाते नसलेल्या व्यक्तीला रोख स्वरूपात रक्कम देण्याच्या सुविधेसाठीही RBI ने मर्यादा कायम ठेवली आहे. या अंतर्गत एका व्यवहारात 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. मात्र, एका लाभार्थ्याला महिनाभरात जास्तीत जास्त 25 हजार रुपये रोख स्वरूपात मिळवता येतील. ही सुविधा ATM, अधिकृत बँक प्रतिनिधी किंवा अन्य मान्यताप्राप्त माध्यमांतून वापरता येईल.
या व्यवहारांमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक पडताळणे आणि अधिकृत ओळखपत्राच्या आधारे नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणाची अटही लागू करण्यात आली आहे.
RBI च्या निर्देशांनुसार, या माध्यमातून होणारे पैसे हस्तांतरण रिअल-टाइम किंवा जवळपास रिअल-टाइममध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थलांतरित कामगार, ग्रामीण भागातील नागरिक आणि बँकिंग सुविधांपासून दूर असलेल्या लोकांना अधिकृत माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे सुलभ होऊ शकते.