हिंगोलीकरांना पावने दोन महिने प्रतिक्षा करावी लागली
हिंगोली (Hingoli Municipal Council) : हिंगोली नगर पालिकेसह औंढा नागनाथ, सेनगाव नगर पंचायतमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकार्यांची नियुक्ती झाली नव्हती. या ठिकाणी प्रभारी राज सुरू असताना शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या शासन निर्णयात हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती प्रांजली मुंडे तर औंढा नागनाथ नगर पंचायत मुख्याधिकारी पदी धनंजय उप्पलवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोघेही अधिकारी परिविक्षाधीन आहेत.
हिंगोली नगर पालिका (Hingoli Municipal Council) अ दर्जाची आहे. येथील मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांची १७ जूनला वाशिम येथे बदली करण्यात आली. त्यांना हिंगोली नगर पालिकेतून कार्यमुक्तही करण्यात आले. येथील प्रभारी मुख्याधिकारी पदाचा पदभार जिल्हा खनिकर्म अधिकारी अश्विनकुमार माने यांच्याकडे सोपविण्यात आला होता. हिंगोली मुख्याधिकारी पदी कोणाची नियुक्ती होती. याकडे हिंगोलीकरांचे लक्ष लागले होते. शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला राज्यातील २३ नगर पंचायत व नगर परिषद मुख्याधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. ज्यामध्ये हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी पदी परीविक्षाधीन असलेल्या श्रीमती प्रांजली मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे औंढा नागनाथ नगर पंचायतमध्ये (Hingoli Municipal Council) कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणुन निशीकांत प्रचंडराव हे होते. त्यांची बदली सन २०१९ मध्ये झाल्यानंतर आतापर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी लाभले नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रभारी राज सुरू होता. शेवटचे प्रभारी मुख्याधिकारी गणेश दत्ताप्पा गांजरे हे होते. शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या आदेशात परिविक्षाधीन मुख्याधिकारी धनंजय उप्पलवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत सेनगाव नगर पंचायतीला मुख्याधिकारी लाभले नसल्याने येथे प्रभारी मुख्याधिकारी पदी गणेश गाजरे हे कार्यरत आहेत.