12 नोव्हेंबरपासून मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये तांत्रिक बिघाड; सर्व्हर बंद पडल्याने इतर यंत्रणांवर वाढला भार, सेवा सुरळीत करण्यासाठी कंपनीकडून पर्यायी उपायांचा शोध.
नवी दिल्ली : जगभरातील कोट्यवधी यूजर्ससाठी महत्त्वाच्या असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल सेवांमध्ये मोठा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. Outlook, Microsoft Teams आणि Copilot यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर सेवा वापरताना अडचणी येत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, कंपनीकडून सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असूनही अद्याप अपेक्षित सुधारणा झालेली नाही. मायक्रोसॉफ्टने स्वतः या समस्येबाबत माहिती देत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पर्यायी उपाययोजनांवर काम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
12 नोव्हेंबरपासून या तांत्रिक समस्येला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. 13 तारखेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर मायक्रोसॉफ्टने आपल्या सेवांच्या सद्यस्थितीबाबत अपडेट दिले. मात्र, दुरुस्तीच्या प्रयत्नांनंतरही सेवा पूर्णपणे सुरळीत झालेल्या नाहीत. त्यामुळे नेटवर्कवरील अतिरिक्त वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करणे आणि उपलब्ध यंत्रणेची क्षमता वाढवणे यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.
नेमका कशामुळे झाला मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये बिघाड?
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, काही भौगोलिक क्षेत्रांमधील सर्व्हर अचानक बंद पडल्यामुळे तांत्रिक यंत्रणेतील संतुलन बिघडले. परिणामी, इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व्हरवर अतिरिक्त कामाचा भार पडला. यामुळे विविध सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना लॉगिन, ई-मेल आणि इतर सुविधांमध्ये अडथळे येऊ लागले.
विशेष म्हणजे, हा वाढलेला ताण केवळ यूजर्सची संख्या वाढल्यामुळे निर्माण झालेला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. नेटवर्कमधील वाहतुकीचे असमान वितरण आणि काही सर्व्हर बंद पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तांत्रिक यंत्रणेची क्षमता वाढवण्यासोबतच नेटवर्कमधील असमतोल दूर करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
Outlook, Teams आणि Copilot वापरणाऱ्यांना मोठा फटका
या तांत्रिक बिघाडाचा सर्वाधिक परिणाम मायक्रोसॉफ्टच्या लोकप्रिय सेवांवर दिसून येत आहे.
-
Microsoft Outlook : ई-मेल उघडणे, नवीन मेल पाठवणे, आलेले मेल प्राप्त करणे आणि इनबॉक्स लोड होण्यामध्ये अडचणी येत आहेत.
-
Microsoft Teams : ऑनलाइन संवाद आणि काही महत्त्वाच्या सुविधांच्या वापरात अडथळे निर्माण झाले आहेत.
-
Microsoft Copilot : एआय आधारित सहाय्यकाच्या काही सुविधांमध्ये तांत्रिक समस्या जाणवत आहेत.
या समस्येमुळे जगभरातील यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जवळपास 1 लाख 30 हजार लोकांनी या सेवांमधील अडचणींबाबत तक्रारी केल्या आहेत.
भारतातील इंडिगोच्या ई-मेल सेवांवरही परिणाम
मायक्रोसॉफ्टच्या जागतिक स्तरावरील तांत्रिक समस्येचे पडसाद भारतातही उमटले आहेत. देशातील प्रमुख विमान कंपनी इंडिगोच्या ई-मेल सहाय्य सेवांनाही या बिघाडाचा फटका बसला आहे.
इंडिगोकडून यासंदर्भात ग्राहकांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे ई-मेलद्वारे पाठवलेले संदेश प्राप्त करण्यात विलंब किंवा अडचणी येऊ शकतात, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टकडून तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, Outlook, Teams आणि Copilot या सेवा पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, याकडे जगभरातील यूजर्सचे लक्ष लागले आहे.